loading...

MGID

loading...

"इतर धर्मावर टिका करण्यापेक्षा आपला धम्माचे चांगलेपण स्वतःच्या आचरणातून इतरांना पटवून द्यावे....
आज घडीला स्वतःला बौद्ध म्हणवून घेणारी बरीच लोकं  हिंदू धर्मावर टीका करण्यातच व्यर्थ वेळ खर्ची घालताना दिसत असतात.
हिंदू धर्माच्या चुका, उणिवांवर बोट ठेवून खरेच आपण या हिंदू धर्माला सुधारु शकणार आहोत काय? कदाचित आमचा धम्म त्यांच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे दाखविण्याचा प्रयत्न असावा.परंतु खरेच यातून आम्हाला काय निष्पन्न होणार आहे ?
धर्मांतरानंतर अर्थात हिंदू धर्म त्यागल्यानंतर त्याच्या उणिवा, चुका दाखविण्याची आपणास खरेच आता गरज राहिली आहे काय ? 
"हिंदू धर्माची उंची कमी करण्यापेक्षा आपल्या धम्माची उंची वाढविण्यात ताकद खर्ची केली तर बरे होईल."

*बुद्धांचा धम्म म्हणजे अस्सल मौल्यवान रत्नांची खाण आहे.* धम्म मार्गावर दोन पाऊले जरी अग्रेसर झालोत की याची अनुभूती आल्यावाचून राहणार नाही. यासाठी आपला संकल्प आणि थोडेसे परिश्रम घेण्याची तेवढी गरज आहे.

आजही स्वतःला बौध्द म्हणवून घेणारी मंडळी पुर्वाश्रमीच्या जाती आणि अनेक हिंदु परंपरा पाळताना दिसतातच, स्वतःला बौद्ध म्हणून मिरवून घेऊनही अजुन पर्यंत 'बुध्दांची उपासना' आम्हाला आजवर करता आली नाही.
*ना आम्ही धड हिंदु आहोत ना धड बौद्ध.*

बुध्द, बाबासाहेब यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांचे पालन करुन धम्माचरण करण्या ऐवजी त्यांची केवळ भौतिक पुजाच केली जात असल्याचे दिसत आहे.(काही अपवाद सोडून) 

खरं पाहता बुद्धांच्या अनमोल धम्मास आपल्याच काही लोकांनी   विकृत स्वरूपात प्रस्तुत करीत आहेत हे मान्य करावे लागले आहे. स्वतःला बौद्ध म्हणवून घेणारेच बाबासाहेबांच्या एकाही आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत.धर्मांतराच्या ६४ वर्षात ६४ वेळा सुध्दा विहाराकडे आमची पाऊले वळली नसतील.

आठवाड्यातून निदान एकदा, फक्त रविवारी सहपरिवार विहारात जाण्याच्या सुध्दा बाबासाहेबांच्या आदेशाचे पालन करता येत नसेल तर अशा महाभागांना हिंदू धर्मावर बाबासाहेबांचे हवाले देवून टीका टिप्पण्या करण्याचे नैतिक अधिकार आहेत कसे काय असु शकतील ?

स्वतःचे आत्मपरीक्षण करुन दुसऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा स्वत: धम्माचा अभ्यास करुन प्रथम स्वतःला घडवावे.
बुद्धांचे ८४,००० स्कंधात विभागली गेलेली अमृत वाणी तर खुप दूर राहिली,बाबासाहेबांचे सुध्दा साहित्य अभ्यासण्याची आम्हाला उभ्या आयुष्यात आवश्यकता वाटली नाही. 

आमच्या आणि भविष्यातील येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शन आणि कल्याणासाठी प्रकुर्ती स्वास्थ्याची चिंता न करता प्रचंड परिश्रमाने निर्माण केलेल्या बाबासाहेबांच्या या अनमोल ग्रंथ संपदा साहित्याची आम्ही अवहेलना करीत नाहीत काय?

चला,आम्ही आमच्या जीवनात खुप बिझी आहोत,संसाराच्या एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आमच्या शिरावर आहेत त्यामुळे आमच्याकडे फुरसत नाही आहे, असेही थोडा वेळ मान्य करुन घेऊ या. आमच्या आणि समग्र मानवतेच्या कल्याणासाठी हिंदु धर्माच्या अमानवीय प्रथापरंपरेच्या नरक यातनातून आपली मुक्तता करुन निर्मळ   बौध्द धम्माच्या अथांग  महासागरात युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आणून सोडले आहे हे सत्य तरी आम्ही स्वीकारतो ना!

या नवीन प्रकाश मार्गावर घेऊन जाताना बाबासाहेबांनी आपल्या उरावर या विश्वकल्याणी धम्माची प्रचार आणि प्रसाराची सुत्रे  आपल्या अनुयायींवर सोपवताना विश्वास व्यक्त करुन "भावी बौद्धमय भारत" घडविण्याचे स्वप्ने पहिलीत. ज्यां समाजाकडून या  महामानवाने अपेक्षा केली होती त्या धम्मदीक्षित समाजाने हे कार्य   समोर नेण्यासाठी प्रामाणिक पणाने आपली कटिबद्धता राखली आहे काय ? निदान 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हां एकमेव ग्रंथाचे  वाचन करुन रितसर आकलन करण्याची उसंत सुध्दा आपल्या अनुयायींना मिळाली नाही.हे कटु सत्य आपण स्वीकारलेच पाहिजे.(अपवादात्मक महानुभवांना नमन करतो)

एकाही शिलाचे पालन करु न शकणारे अनेक महाभाग बाबासाहेबांच्या याच ग्रंथातून काही विधानांचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून स्वतःची आणि संपुर्ण समाजाची दिशाभूल करण्यातच धन्यता मानताना जेव्हा दिसते तेव्हा केवळ यांच्या बुद्धीची किंव करण्यापलीकडे काहीही करता येणे शक्य नाही.

धम्मज्ञान नाही त्यामुळे चिंतन नाही त्यामुळे आकलन नाही त्यामुळे चेतना नाही त्यामुळे आचरण नाही त्यामुळे बौध्द धम्माच्या नावाखाली सुध्दा अधिकतर अंधश्रद्धाच जोपासल्या जाऊ लागल्या असल्याचे विदारक चित्र समाजापुढे निर्माण होत आहे. "स्वतःला हिंदु समजणारे" आणि "नवदीक्षित स्वतःला बौद्ध समजणारे" यामध्ये कुठलाही बौद्धिक फरक असूच शकत नाही.
ही दोनही विरुद्धार्थी टोकावरची धृव 'तुतु मीमी' करीत केवळ आपापसात चिखलफेक करीत असताना दिसत आहेत.मनुष्य जीवनाचा खरा अर्थ, खरं पाहता तथागतांच्या खऱ्या जीवन मार्गापासून ही दोनही टोकावरची लोकं अजुनही कोसो दूर आहेत.दोघेही अधर्मीच आहेत.

 तथागतांचा अनमोल संदेश:
*अत्तही अत्तनो नाथो, अत्तही अत्तनो गती* 
यातील मर्म आम्हाला शोधता यावे. तात्पर्य एवढेच की, आपली ताकद, वेळ, श्रम इतरांवर टीका टिपणी करीत व्यर्थ घालविण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी खर्च झाला तरच आपले हे मनुष्य जीवन सार्थकी लागून बाबासाहेबांच्या धेय्यपूर्तीसाठी सहाय्यक होऊ शकेल. खऱ्या धम्माचे तथागतांच्या मार्गाचे अनुगामी होता येईल.

येणाऱ्या बुद्ध जयंती पर्यंत आपण सर्वांनी एक संकल्प करुन बघू या. बुद्धांची धम्मशिकवण प्रज्ञापूर्वक समजून आचरणात आणण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करु या. रोजच्या दिवसाची सुरुवात त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करुन धम्माचरण करण्याचा आणि निदान रविवारी सहपरिवार विहारात जाऊन स्वतःला आणि परिवाराला धम्मसंस्कारित करवून घडविण्याचा....

या प्रात्यक्षिक अनुभवानंतर ठरवू या, खरेच आपलं आयुष्य बदलून जातय अथवा नाही.
*धम्म वादविवादातून नाही तरी आचरणातून प्रकाशित व्हायला हवा....*

🙏🏻🌹🙏🏻
"इतर धर्मावर टिका करण्यापेक्षा आपला धम्माचे चांगलेपण स्वतःच्या आचरणातून इतरांना पटवून द्यावे.... "इतर धर्मावर टिका करण्यापेक्षा आपला धम्माचे चांगलेपण स्वतःच्या आचरणातून इतरांना पटवून द्यावे.... Reviewed by Raj morey on September 06, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.