loading...

MGID

loading...

हजारो वर्षांपूर्वी राजस्थान होते बौद्धस्थान; ९ व्या शतकापर्यंत बौद्धधम्म इथे बहरला होता


राजस्थान म्हटले की मोठे किल्ले, सुंदर नक्षीकाम केलेले राजवाडे, त्यांचे दरवाजे, सुंदर महल, गुलाबी जयपूर, माउंट अबू, पुष्कर क्षेत्र, जैसलमेरचे वाळवंट असे चित्र उभे राहते. पण हेच किल्ले आणि महल होण्यापूर्वी राजस्थानमध्ये एकेकाळी सम्राट अशोकाचे राज्यस्थान होते. आणि ९ व्या शतकापर्यंत बौद्धधम्म इथे बहरला होता, हे वाचून आश्चर्य वाटेल. बैरात विहार, झलावरची खोल्व्ही लेणी, दौसामधील भांदारेज (भद्रावती) आणि रामगाव (टोंक जिल्हा)अशी अनेक बौद्ध ठिकाणे बहरलेल्या धम्माची साक्ष देतात. मात्र स्वातंत्र्यानंतर इथल्या प्रत्येक राज्य सरकारने तसेच पुरातत्व खात्याने या बौद्ध स्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

जयपूर दिल्ली हायवेवर ५२ कि. मी. वर विराट नगर जवळील बीजक पहाडी या निसर्गरम्य पर्वतराजीत एक पुरातन चैत्यगृह आहे. हा सर कॅनिंगहॅम यांनी १८३६ मध्ये शोधला. काळाच्या ओघात त्या चैत्यगृहाचा फक्त गोल पाया राहिला आहे. पण त्यावरून त्याच्या भव्य आकाराची व उत्कृष्ट वास्तू संकल्पनेची कल्पना येते. येथील केंद्रीय भागाच्या स्तुपाभोवती एकूण २६ अष्टकोनी लाकडी स्तंभ होते. आत प्रदक्षिणासाठी मार्ग होता. आजूबाजूला भिक्खूंचे निवासस्थान होते.आता फक्त या वास्तूंचा पाया शिल्लक आहे. तसेच विविध आकारांच्या शिळा इथे विखुरलेल्या आहेत. अशोक राजाचे शिलालेखही या चैत्यगृहाजवळ आढळले. सन १८३७ मध्ये त्यावरील ब्राम्ही लिपीचे वाचन जेम्स प्रिसेप यांनी केले. सद्यस्थितीत ते शिलालेख एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल, कलकत्ता येथे आहेत.


या शिलालेखात सम्राट अशोकराजा म्हणतो :

‘मगध साम्राज्याचा प्रियदर्शी राजा संघाला वंदन करतो. बुद्ध, धम्म आणि संघ यावर माझी अत्यंत श्रद्धा आहे. बुद्धांनी जो मानवास उपदेश केला आहे तो यथार्थ केला आहे. त्या उपदेशाने अधिक काळ मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो की धर्मामधील विनय सुत्त, मुनि गाथा व मुनि सुत्तातील उपदेशाचे पालन भिक्खू आणि भिक्खुंणी यांनी करावे. व त्यानुसार मार्गक्रमणा करावी. त्याचप्रमाणे नगरातील सर्व पुरुष आणि स्त्रीयां यांनी देखील त्याचे पालन करावे. या उद्देशाने हा शिलालेख मी लिहित आहे’.राजस्थानमध्ये हत्यागौड येथे ५ बौद्ध लेण्या सापडल्या आहेत. विनायक टेकडी येथील चैत्य अजिंठा लेण्यासारखे आहे. मात्र पुरातत्व खात्याला फक्त राजवाडे आणि महल दिसतात. बौद्ध पुरातन स्थळांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकेकाळी सम्राट अशोकाच्या आदेशांचे व बुद्ध उपदेशाचे पालन करणारा ‘पालि’ आडनावाचा पुढारलेला समाजही राजस्थान मध्येच आहे. एवढेच नव्हे तर ‘पालि’ नावाचा जिल्हा व शहर राजस्थानमध्ये आहे. बडगुजर समाज सुद्धा इथलाच. आज ते बुद्धिझम विसरले असले तरी इथल्या काही संशोधकांनी एकेकाळी राजस्थान हे बौध्दस्थान असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

-संजय सावंत,नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

हजारो वर्षांपूर्वी राजस्थान होते बौद्धस्थान; ९ व्या शतकापर्यंत बौद्धधम्म इथे बहरला होता हजारो वर्षांपूर्वी राजस्थान होते बौद्धस्थान; ९ व्या शतकापर्यंत बौद्धधम्म इथे बहरला होता Reviewed by Raj morey on April 21, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.