सन २०१७ मध्ये पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब प्रांतांमध्ये शिरगणती केली गेली. आणि त्यामध्ये फक्त १८८४ लोकांची बौद्ध म्हणून नोंद झाली. हे वास्तव पाहून कुठल्याही बौद्ध बांधवास धक्का बसेल. २३०० वर्षांपूर्वी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म कंदाहारच्या पुढे पार अफगाणिस्तान पर्यंत पसरला होता.
सातव्या शतकापर्यंत तेथे बौद्ध संस्कृती बहरली होती. मात्र इस्लाम आल्यानंतर होत्याचे नव्हते झाले. आज तेथे बौद्ध संस्कृतीचा मागमूस नसून फक्त पडझड झालेले स्तुप आणि विहारांचे भग्न अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. तसेच हुणांच्या टोळ्यांपासून वाचलेला बावरी आणि रोही हा बौद्ध समाज कसाबसा तेथे टिकून राहिला आहे.
आजमितीला तेथील पंजाब प्रांतात फक्त बारा-तेरा गावात बावरी समाज विखुरलेला असून त्यांची लोकसंख्या अवघी दोन अडीज हजारापर्यंत राहिलेली आहे. हे कटू सत्य स्वीकारणे खूप जड जात आहे. या समाजाच्या होत असलेल्या कोंडीचे चित्रण BBC NEWS ने केले असून ऑगस्ट २०१७ पासून युट्युबवर उपलब्ध असल्याचे दिसते. या बावरी समाजातील एक शिक्षक जुम्मन म्हणतो की ‘इथे आम्हाला मुर्तीपुजा पण करता येत नाही. आमचा देव्हारा रिकामा असतो. कारण बुद्धमूर्तीची पूजा जर करू लागलो तर आजूबाजूच्या गावातील लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल.
आम्हाला त्यांच्यापासून दबून रहावे लागते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आमच्या काही मूळ बौद्ध परंपरा, चाली-रीती हळूहळू नष्ट होत आहेत. परदेशातून जरी काही लोक आले तरी आम्हाला त्यांची भाषा कळत नाही आणि ते आमची भाषा जाणत नाहीत. इथे आमच्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे शासन दरबारी कोणीच शिल्लक राहिलेले नाही. सर्व थरावर आम्हाला योग्य वागणूक सुद्धा दिली जात नाही. हा समाज आज एवढा छोटा राहिला आहे की हळूहळू पंधरा-वीस वर्षात तो ही नष्ट होऊन जाईल अशी खंत वाटते’. जुम्मनचे हे बोल ऐकून कुठल्याही बौद्ध बांधवाचे काळीज गलबलून जाईल.
loading...
पाकिस्तानात आज असंख्य पुरातन बौद्ध स्थळें असून जगातील विविध भागातून अनेक पर्यटक तेथे येतात. तसेच तिथल्या अवशेषांच्या दुरुस्तीसाठी इटली, कोरिया सारखे अनेक देश त्यांना भरघोस निधी देतात. परंतु पाकिस्तानने तीथल्या मूळ आणि अल्पसंख्याक बौद्ध समाजासाठी आजपर्यंत काहीही केलेले नाही. दिवसेंदिवस त्यांची स्थिती कठीण होत आहे. तरी तिथल्या बावरी आणि रोही या अल्पसंख्याक बौद्ध समाजाचे वास्तव जगातील सर्व राष्ट्रांपुढे लवकर येवो आणि त्यांना मदत, दिलासा मिळो अशी प्रार्थना प्रत्येकाने करणे आवश्यक आहे
पाकिस्तानातील अल्पसंख्यांक बौद्ध समाज
Reviewed by Raj morey
on
April 24, 2020
Rating:

No comments: