loading...

MGID

loading...

बौद्ध राजा थिबा आणि रत्नागिरी


थिबा हा ब्रह्मदेशाचा अखेरचा राजा होता. त्यांचा जन्म १८५९ साली झाला. जगातील सगळ्याच राजघराण्यात कटकारस्थाने होतात. त्यानुसार थिबांचे राजघराणे देखील त्याला अपवाद नव्हते. वयाच्या २६ व्या वर्षी राज्यगादीवर असतानाच सन १८८५ मध्ये ब्रिटिशांनी राजघराण्या विरूद्ध मोठी मोहीमच आखली.
स्वतःचे व्यापारी हितसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी तिथल्या ब्रिटिश व्यापाऱ्यांनी राजा आणि राणीचे चारित्र्यहनन केले. त्यांच्याविरुद्ध पूर्वग्रहदूषित बनावट कहाण्या तेथील जनतेत प्रसारित केल्या. राजे थिबा हे स्वार्थी, व्यसनी व अकार्यक्षम आहेत अशी त्यांनी त्यांची प्रतिमा रंगवली. परंतु सामान्य जनता खरे काय ते जाणून होती. त्यांचा राजघराण्यास पाठिंबा होता.
बौद्ध धर्माचे पाठीराखे म्हणून त्यांना मान होता. शिवाय आयरिश भिक्खू ‘धम्मलोक’ यांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ जोर धरीत होती. त्यामुळे घाबरून युद्धानंतर थिबा राजाला व राणीला कावेबाज ब्रिटिशांनी रत्नागिरी येथे आणून नजरकैदेत ठेवले. म्यानमारचा किनारा जेव्हा राजाने सोडला तेव्हा त्याच्या गजशाळेतील ऐरावताने देखील त्यावेळी प्राण सोडले असे म्हणतात
राजाला हद्दपार केल्यावर ब्रिटिश सैनिकांनी राजवाड्या मधील अनेक वस्तूंची लुटालूट केली. राजांचा मुख्य खजिना लुटण्यात आला. अनेक ऐतिहासिक कागदपत्रे, भूर्जपत्रे, वंशावळी नष्ट केल्या गेल्या. पिढ्यानपिढ्या चालत आलेले अनेक दागदागिने, मणिकमोती, जवाहिरे, बुद्धमूर्त्या आणि किमती सामान पळविण्यात आले. राजा आणि राणीला हा फार मोठा आघात होता. मात्र राजा हा बुद्ध उपदेशांचे तंतोतंत पालन करणारा होता.
तरीही ब्रम्हदेशा सारखे मोठे चराऊ कुरण मिळत असल्याने व राजघराण्याचा विरोध मोडण्यासाठी ब्रिटिश अधिकारी आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या राजाची कोंडी करीत राहिले. परंतु थिबा राजाने बौद्ध तत्वज्ञानानुसार मार्गक्रमण करीत शांतपणे रत्नागिरीतील आपला उर्वरित काळ व्यतीत केला. याच काळात तेथे त्यांनी परवानगी घेऊन ब्रम्हदेश शैलीचा राजवाडा बांधला.
रत्नागिरीत राजा आणि त्यांचे कुटुंब ३१ वर्ष ब्रिटिश शासनाच्या नजरकैदेत राहिले. नवीन बांधलेल्या राजवाड्यात नोव्हेंबर १९१० मध्ये गृहप्रवेश करताना म्यानमार वरून पाच बौद्ध भिक्खूंना बोलविण्यात आले होते. बौद्ध पद्धतीने विधी झाल्यावर थिबा राजे भावूक झाले. दुःख सहन करण्याची सहनशीलता कुटुंबाला प्राप्त व्हावी यासाठी भिक्खूंकडे त्यांनी आशीर्वाद मागितला.
थिबा राजाला एकूण चार मुली होत्या. भारतात आल्यावर त्या चारी मुलींचे शिक्षण काही योग्य झाले नाही. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी फिया ही राजवाड्यात सेवेत असलेल्या गोपाळ सावंत नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली.
तिला त्याच्यापासून २६ नोव्हेंबर १९०६ रोजी मुलगी झाली. तिचे नाव टुटू होते. पाहिले महायुद्ध चालू असतानाच थिबा राजे यांचे १९१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर ब्रिटिशांनी ब्रम्हदेशाच्या या राजघराण्याला मायदेशी जाण्याची परवानगी दिली. सर्वजण म्यानमारला गेले. पण थोड्याच दिवसांनी फिया आपली मुलगी टुटूला घेऊन रत्नागिरीला परत आली. व तेथेच आयुष्यभर राहिली. ३ जून १९४७ रोजी तिचे निधन झाले.
तिची मुलगी टुटूने शंकर पवार यांचेशी लग्न केले. तिला ४ मुली आणि ७ मुलगे झाले. २४ ऑक्टोबर २००० मध्ये टुटू सुद्धा गेली. १६ डिसेंबर २०१६ मध्ये थिबा राजांना जाऊन शंभर वर्षे झाली. त्या स्मृतिदिनी दिवशी म्यानमारचे उपराष्ट्रपती यु मंत स्यू आणि सैन्यदल प्रमुख यांनी रत्नागिरीला येवून थिबा राजाच्या समाधीला भेट दिली. त्यावेळी टुटूच्या सर्व मुलांची आणि म्यानमारवरून आलेल्या सर्व नातेवाईकांची गळाभेट झाली.
थिबा राजाचे म्यानमारमधील वंशज आज उच्चशिक्षित आहेत. मात्र रत्नागिरीतील त्यांचे वंशज मोलमजुरी करीत आहेत. त्यांना ब्रिटिश आणि भारत सरकारने सुद्धा कुठली मदत केली नाही. अलीकडे थिबा राजवाड्यात वर्षातून एकदा संगीत महोत्सव आर्ट सर्कलद्वारे आयोजित केला जातो.
त्यावेळी राजवाडा रोषणाई केल्याने उजळतो. मोठा जल्लोष होतो. पण एरवी त्या राजवाड्यात उभे राहिले असता, शांत समुद्र किनारा पाहताना एक दुःखद झुळूक स्पर्शून गेल्याचा भास होतो. अस्पष्ट हुंदका तिथल्या प्रत्येक दालनात जाणवतो.
थिबा राजाची बुद्धांप्रती असलेली श्रद्धा इथे कोणालाच दिसली नाही. म्हणून जेव्हा कधी कोकणात रत्नागिरीला राजवाडा बघण्यास जाल तेव्हा एक दिप त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आवश्य लावा. कारण म्यानमारच्या प्रत्येक राजाने थेरवादी बौद्ध परंपरा बळकट केल्याचे दाखले इतिहासात जागोजागी आहेत.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)
बौद्ध राजा थिबा आणि रत्नागिरी बौद्ध राजा थिबा आणि रत्नागिरी Reviewed by Raj morey on April 22, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.